रायगड जिल्ह्यातील किल्ले
रायगड किल्ला :
रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.
मुरुड-जंजिरा किल्ला :
मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला ‘दरिया दरवाजा’ असे म्हणतात. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पहावयास मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावरती पुरातन काळी हरतर्हेच्या सोयीसुविधा जसे महाल, दराबारीसाठी खोल्या, मशीद, दोन छोटी गोड्या पाण्याची तळी इत्यादी उपलब्ध होते. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुस्थितीत आहे.
मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती असलेल्या तीन महाकाय तोफा – ‘कालालबंगडी’, ‘चावरी’, ‘लांडा कासम’ या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. असे म्हणतात कि पूर्वी या तोफा त्यांच्या लांबपल्ल्याच्या माऱ्यासाठी ओळखल्या जायच्या.
कुलाबा किल्ला :
कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे दोन दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वेशिष्टय आहे. इसवी सन १७१३ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासाहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले.
ज्या किल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले, तो कुलाबा किल्ला किनार्यापासुन जवळपास १ कि.मी. अंतरावर आहे. शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३४० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे.
समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशव्दारा पासून सुमारे १५ फूटा पर्यंत भरतीचे पाणी येत नाही. मुख्य भागात पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. मुख्यव्दारातुन आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो, तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते. तसेच तेथे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे. गणपती मंदिरा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी आहे.
किल्ल्यावरील पुष्करणी समोर १७५९ साली राघोजीराजे आंग्रे यांनी सुरेख गणपती मंदिर उभारले. मंदिरातील सिध्दीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ती असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान ठरली आहे. गाभार्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सुर्य, विष्णु यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे ‘श्री गणेश पंचयतन’ म्हणून ओळखले जाते. मराठी महिन्यातील माघ महिन्यात गणेश जयंतीला मोठा उत्सव होतो.
किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोडया पाण्याचा एक तलाव आहे, तसेच गोडया पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत.
समुद्राला ज्यावेळी ओहोटी असेल, त्यावेळी आपण किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकातो. यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक माहिती असणे गरजेचे आहे. कुलाबा किल्ला पहाण्यासाठी मुख्य दरवाजात असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयात तिकीट घ्यावे लागते.
सुधागड किल्ला :
सुधागड (भोरपगड) किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेला प्रेक्षणीय किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून पश्चिमेकडे सुमारे ५० किमी, लोणावळ्यापासून दक्षिणेकडे सुमारे २५ किमी तसेच रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे १० किमी अंतरावर आहे. सुधागड किल्ल्याला भोरपगड असेही नाव आहे. शिवाजी महाराजांनी भोरप गडाचे नाव बदलून सुधागड किल्ला असे केले. सुधागड परिसरात ठाणाळे आणि खन्डसाबळे लेण्यांचे अस्तित्त्व आहे.
सुधागड पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेस दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहे. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. येथे चार विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.
संपर्क तपशील
पत्ता: रायगड

कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.
रेल्वेने
सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.
रस्त्याने
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ४ हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.