रायगड जिल्हा परिषद, अलिबाग महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर प्रणाली प्रशिक्षण व आढावा बैठक
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद-अलिबाग यांच्या वतीने सोमवारी ता.4 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी,विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती रसिका केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कुरूळ येथील सुरूची हाॅलमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी सभापती रसिका केणी तसेच जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी उपस्थित जिल्हास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. अंगणवाडी स्तरावर राबवल्या जाणा-या योजना, बालकांचे पोषण आणि महिलांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुदृढ व्हावे आणि प्रत्येक महिलेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून यासाठी काम करू, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रम व आढवा बैठकीसाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांच्यासह, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सदस्य मानसी दळवी, समितीच्या सदस्य उर्वशी वाडकर, मनाली काळीजकर, पंचायत समिती सभापती रंजना वासकर, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, जि.प. सदस्य वर्षा दोरे, जि.प. सदस्य सुवर्णा ठाकरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुचिक, विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका आदी उपस्थित होते.