परिचय
रायगड
रायगड जिल्हयाचे स्थान महाराष्ट्रात अनन्य साधारण आहे. रायगड हे इंग्रजी अंमल सुरु होण्यापूर्वी कित्येक वर्षे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे केंद्र होते. महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी चवदार तळयावर सत्याग्रह करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मानवांना पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करुन सामाजिक समतेचा व समानतेचा महान आदर्श जगासमोर ठेवला. त्याप्रमाणे अलिबाग येथील चरी येथे खेाती विरुध्द मा. ना.ना.पाटील यांचे सहकार्याने आंदोलन करुन भुमीहिनांना जमीन मिळवून देण्याचे महान कार्यही याच रायगड भूमीत संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यासारख्या महामानवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही रायगड जिल्हयाची भूमी आहे.
रायगड हे महाराष्ट्राचे भाताचे कोठार आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले केंद्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच या जिल्हयांमध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारचे प्रमुख केंद्र कुलाबा किल्ला हे होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख आरमार केंद्र, अलिबाग, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जन्म तालुका पनवेल मधील शिरढोण गाव , नरवीर तानाजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे जन्म गाव, भारताचे माजी अर्थ मंत्री कै. चिंतामणराव देशमुख यांचे जन्मगाव रोहा, श्री. संत विनोबा भावे यांचे जन्मगाव गागोदे बुद्रुक तालुका पेण अशा महान वीरांची जन्मगावे याच जिल्हयात आहेत. त्याचप्रमाणे सर्व जगाला स्वाध्याय परिवारात सामावून घेणारे परमपूज्य श्री.पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मगाव रोहा, तसेच श्री.समर्थ प्रसादिक आध्यात्मिक श्री.सेवा समितीचे कार्यवाह नानासाहेब तथा विष्णू धर्माधिकारी यांचे जन्मगाव रेवदंडा तालुका अलिबाग हे सुध्दा याच जिल्हयात आहे. या जिल्हयाने महाराष्ट्राला व देशाला अनेक महान सुपुत्र दिले याचा रायगड वासियांना सार्थ अभिमान आहे. श्री.समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ जेथे बसुन लिहीला ती शिवथरघळ तालुका महाड, स्वातंत्र्य लढतीत जंगल सत्याग्रहामध्ये बलिदान केलेल्या हुतात्म्यांची भुमी चिरनेर तालुका उरण, रायगड जिल्ह्यात अनेक लेण्या,स्तुप,भिल्ले इ.कोरल्या आहेत. त्यापैकी महाड तालुक्यात व तळा तालुक्यात भगवान बुध्दांच्या प्राचीन लेण्या अस्तित्वात आहेत.
अष्टविनायकांपैकी महड व पाली येथील विनायकांची स्थाने व साळाव येथील विक्रम इस्पात कंपनीने बांधलेले बिर्ला गणेश मंदिर याच जिल्हयात आहेत. मुरूड – जंजिरा, कुलाबा यासारखे जलदुर्ग आहेत. त्याच प्रमाणे रायगड, सागरगड, कर्नाळा यासारखे डोंगरी किल्ले सुध्दा याच जिल्हयात आहेत.
दृष्टिक्षेपात रायगड जिल्हा
- जिल्ह्याचे नाव : रायगड
- जिल्हा मुख्यालय : अलिबाग
- जिल्हा क्षेत्र (चौ. किमी) : ७,१५२ (चौ. किमी)
- किनारपट्टीची लांबी : १२२ किमी
- पंचायत समित्यांची संख्या : 15
- एकूण ग्रामपंचायतींची संख्या : 811
- एकूण गावांची संख्या : 1932
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची एकूण संख्या : 2603
- खाजगी माध्यमिक शाळांची एकूण संख्या : 662
- एकूण अंगणवाड्यांची संख्या : 3255
- प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण संख्या : 55
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची एकूण संख्या : 288
- पशुवैद्यकीय दवाखान्याची एकूण संख्या : 100
- जिल्हा परिषद एकूण कर्मचाऱ्यांची संख्या : 11147
- ग्रामीण : 1664005
- शहरी : 970195
- एकूण : 2634200
- पुरुष : 1344345
- स्त्री : 1289855