पंचायत समिती कर्जत
अ) परिचय व माहिती:-
कर्जत तालुक्यातील पंचायत समितीची स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 अंतर्गत करण्यात आली असून ती तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत आहे. पंचायत समिती ही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करते व ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविते.
कर्जत तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ६५१.२ चौ.कि.मी. असून तालुक्यात २०२ गावे आणि ५५ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची एकूण लोकसंख्या १,५९,५६६ आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून एकूण १३,२२१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी ८,८५० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. तालुक्यात सरासरी ३५६० मि.मी. पर्जन्यमान होते.
आरोग्य सुविधांमध्ये ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३८ उपकेंद्रे कार्यरत आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत १ पशुवैद्यकीय चिकित्सालय, श्रेणी १ चे ९ व श्रेणी २ चे ६ दवाखाने आहेत. शिक्षण क्षेत्रात २७१ प्राथमिक शाळा कार्यरत असून बालविकास प्रकल्प १ व २ अंतर्गत ३३७ अंगणवाड्या कार्यरत आहेत. पंचायत समिती स्वतःचे कर/शुल्क उत्पन्न तसेच जिल्हा परिषद व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर आपले प्रशासकीय कार्य चालविते.
ब) प्रशासकीय रचना व कार्ये:-
पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी (BDO) आहेत. ते पंचायत समितीच्या ठरावांची अंमलबजावणी करणे, तालुका स्तरावरील विकासकामांवर देखरेख ठेवणे, विविध विभागांच्या योजना प्रभावीपणे राबविणे व ग्रामपंचायतींचे पर्यवेक्षण करणे ही कामे करतात. तसेच ते प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. अधिनियमातील कलम ९८(१) नुसार गट विकास अधिकारी वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे, आवश्यक अहवाल व माहिती मागविणे, कागदपत्रांची अभिरक्षा ठेवणे, अनुदानाची रक्कम काढणे व वितरित करणे इत्यादी अधिकार बजावतात.
सहाय्यक गट विकास अधिकारी ग्रामपंचायतींचे तक्रार निवारण करतात तसेच समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल तयार करतात. ते माहिती अधिकार कायद्यानुसार जन माहिती अधिकारी म्हणून कार्य करतात व ग्रामपंचायतींच्या माहिती अधिकार प्रकरणांमध्ये प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतात.
पंचायत समितीमध्ये सामान्य प्रशासन, वित्त, ग्रामपंचायत, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) इत्यादी विभाग कार्यरत आहेत. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विभाग, उपविभाग बांधकाम, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व बालविकास प्रकल्प कार्यालये तालुका स्तरावर कार्य करतात.
क) उद्दिष्टे व राबविण्यात येणाऱ्या योजना:-
पंचायत समितीचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा जसे की रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा निर्माण करणे, कृषी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे व खते उपलब्ध करून देणे, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, आरोग्य सेवा सक्षम करणे व दुर्बल घटकांसाठी विविध समाजकल्याण योजना राबविणे ही पंचायत समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विशेष कार्यक्रम राबविणे यालाही प्राधान्य दिले जाते.
समाजकल्याण विभागांतर्गत २०% सेस निधीतून मागासवर्गीय, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी योजना राबविल्या जातात. ५% दिव्यांग योजनेअंतर्गत ४०% पेक्षा अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्य दिले जाते. कृषी विभागामार्फत राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना इत्यादी योजना राबविल्या जातात.
प्रधानमंत्री आवास विभागामार्फत रमाई आवास, शबरी आदिवासी घरकुल व इतर घरकुल योजना राबवून गरजू कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना राबविल्या जातात. पाणी व स्वच्छता विभाग प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा, शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासाठी कार्यरत आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षातून १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
या सर्व योजनांद्वारे पंचायत समिती कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.